शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर.

शुरपराक्रमी होळकरांचा छावा-- चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर.
इंदापूर :   

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यानंतर..  मातोश्री अहिल्यादेवी यांना होळकरांच्या गादीवर बसवण्यात आले. मातोश्री अहिल्यादेवींचा कारभार अतिशय चोख आणि निस्वार्थ होता.
पंमातोश्रींच्या मृत्यूनंतर मल्हार रावांचे पुतणे (चुलत चुलत भावाचा मुलगा)व मानसपुत्र तुकोजीराव होळकर यांना होळकरांच्या गादीचा मान मिळाला. 
तुकोजीरावांना चार मुले होती. पहिली पत्नी रखमाबाई यांना काशीराव व मल्हारराव तर दुसरी पत्नी यमुनाबाई यांना विठोजीराव व यशवंतराव.

यशवंतरावांचा जन्म १७७७ साली झाला. काशिराम सर्वात थोरले  व यशवंतराव सर्वात धाकटे होते.
चारही मुले इंदोर आणि महेश्वर येथे मातोश्री अहिल्यादेवींच्या नजरेत वाढलेली होती. तुकोजीराव वृद्ध झाल्यानंतर त्यांच्या हयातीतच त्यांनी ज्येष्ठ पुत्र काशीराव यांच्याकरिता पेशव्यांकडे राजवस्त्राची मागणी केली होती. आपला उत्तर अधिकारी काशिराव असेल असे जाहीर केलें होते.
 परंतु महादजी शिंदेंने होळकरांच्या राज्यात हस्तक्षेप चालू केला, दादागिरी चालू केली, जबरदस्तीने कर वसुली चालू केली त्यामुळे शिंदे आणि होळकर यांच्यामध्ये युद्ध भडकले.
शिंदेंनी अचानक हल्ला केल्यामुळे होळकरांचे सैन्य मारले गेले व मोठ्या प्रमाणात होळकरांचे नुकसानही झाले. यानंतर १५ ऑगस्ट १७९७ रोजी सुभेदार तुकोजीराव होळकर यांचा मृत्यू झाला.
युद्धामुळे होळकर आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. शिंदेंनी पेशव्यांची जवळीक वाढवली . दुसऱ्या बाजीरावाचे मित्र व संरक्षक दौलतराव शिंदे झाले. काशीराव यांना सुभेदारी देण्याची मागणी करून देखील त्यांना सुभेदारी देण्यास टाळाटाळ करण्यात  येऊ लागली. 
पेशव्यांना हाताशी धरून शिंदेंना होळकराची दौलत राज्य छत्री लुबाडायचे  होते हे द्वितीय मल्हारराव यांच्या लक्षात आले.
काशीराव भोळे भाबडे असल्याने त्यांना  सुभेदारी न देता आपणास सुभेदार करावे अशी इच्छा द्वितीय मल्हारराव होळकर यांची होती कारण काशिराव यांना दौलतराव शिंदे सारख्या पाताळयंत्री दुष्ट माणसाला आणि सत्ताधिकार्‍यांना तोंड देणे अशक्य होते. त्यामुळे आपणास  सुभेदार करावे ही द्वितीय मल्हाररावांची इच्छा होती. पण शिंदेंना पेशव्यांनी हातात घेऊन सुभेदारी दिली ती काशीराव यांनाच,  कारण काशिराव हे शिंदे  आणि पेशव्यांचा ऐकण्यात राहणार होते. 

 पण काशीराव भोळे असल्याने शिंदेंच्या व पेशव्यांच्या कचाट्यात  सापडले होते, 

रणनिती आखून शिंदेंना पुण्याबाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता हे यशवंतराव व मल्हाररावांना जाणवत होते.
दुसऱ्या बाजीराव च्या मागे कोणीही वाली नव्हता, शिंदे यांच्या भीतीपोटी कपटनीतीमुळे बाजीरावांनी इंग्रजांसोबत घरोबा निर्माण केला होता.
मल्हारावांनी पेशव्यांकडे बरेच दिवसापासून मागणी केली होती की मला सेनापती पद द्या व सुभेदारी द्या पण ती मागणी पेशव्यांनी  शिंदेंच्या दबावाखाली अमान्य केली. दौलतराव शिंदेंनी मल्हारराव व काशीरावाच्या सुभेदारीस आव्हान देत आहे असे दाखवत गोंधळ उडवून  मल्हाररावाच्या भांबुर्डेच्या छावणीवर हल्ला केला. हा हल्ला अचानक केल्यामुळे मल्हारराव गाफील होते त्यामुळे ते या हल्ल्यात मारले गेले.
१४ सप्टेंबर १७९७ रोजी मल्हाररावांची गर्भवती पत्नी जिजाबाई व कन्या भामाबाई यांना शिंदेंनी  कैदीत टाकले यानंतर हा सर्व प्रकार बघून विठोजी व यशवंतराव भुमिगत झाले.  दौलतरावांचा   होळकर भावा मध्ये फुट पाडण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला.
 यानंतर यशवंतराव  नागपूरच्या राघोजी भोसले यांच्याकडे गेले आणि विठोजी पुण्याबाहेर जाऊन पंढरपूर परिसरात राहिले. विठोजींनी पंढरपूरमध्ये शिंदे पेशव्या विरोधात धुमाकूळ घातला बंड उभारले लुटा लूट सुरू केली. त्यांना पकडण्यासाठी पेशव्यांचा कारभारी कुंजीर व शिंदे यांचा कारभारी घाडगे दोघेही सैन्यासह पंढरपूरला गेले.  विठोजीस पकडून पुण्यात आणले आणि शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली तुडवून विठोजीला मारले. जग जाहीरपणे विठोजीचा खून शिंदेंनी व पेशव्यांनी केला व त्यानंतर त्यांची पत्नी व मुलगा यास कैदेत टाकले.
नंतर शिंदे यांनी नागपूरच्या भोसलेंवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यशवंतरावांना कैद करावे अशी मागणी केली.
 पण भोसलेंनी यशवंतरावांना गुप्त रीतीने बाहेर काढले व तेथून यशवंतराव खान्देश सुलतानपूर नंदुरबार मार्गे धारचे संस्थानिक अनंतराव पवार यांच्याकडे गेले पण पवारांनाही नंतर दमदाटी सुरू झाली ,त्यानंतर यशवंतराव यशस्वीरित्या बाहेर पडून त्यांनी सरळ महेश्वर गाठले (१८००).
 पेशव्यांचे मान्यताप्राप्त होळकरांचे सुभेदार काशीराव पुण्यात नजर कैदेत होते, त्यामुळे महेश्वरचे होळकर संस्थान बेवारस स्थितीत होते.
 माळवा प्रांतातील  लोक राजाहीन होते. होळकर राज्यातील जनतेने यशवंतराव यांना राजा म्हणून मान्य केले .१७९९ मध्ये यशवंतरावांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व खऱ्या अर्थाने मराठ्यांना व उत्तर हिंदुस्थानातील लोकांना वाली मिळाला.
(याच दिवशी फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी फ्रान्स सरकारचा ताबा घेतला होता)
यशवंतराव शूर धाडसी तडफदार पराक्रमी निर्भिड होते.
अभिषेक झाल्यानंतर यशवंतरावांनी घोड्याच्या पाठीलाच आपले राज सिंहासन मानले आणि आपल्या कामास सुरुवात केली. होळकरांचा असलेला प्रदेश ज्योती शिंदे यांनी बळकावला होता तो परत मिळावा यासाठी त्यांनी पुण्यातील पेशव्यांकडे आग्रह धरला.
नंतर द्वितीय मल्हारराव यांची पत्नी व मुलगा विठोजींची पत्नी व मुलगा यशवंतरावांची मुलगी जे की कैद केले होते यांना सोडविण्याची मागणी यशवंतरावांनी केली. दुसऱ्या खंडेरावांना( जे की द्वितीय मल्हार रावांचे पुत्र होते) यांना सुभेदारी द्या ही मागणी पण यशवंतरावांनी केली ,पण पेशवे या मागणीची दखल घेत नाहीत हे लक्षात आल्यावर यशवंतरावांनी पुढील नियोजन केले.

 यशवंतराव एकटेच होते परंतु, महान, कर्मयोगी,पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवींचा वारसा लाभलेले,  हिंदवी स्वराज्याचे रक्षणकर्ता राजा यशवंतराव होळकर हे राष्ट्र अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण होते.

 यशवंतरावांनी उत्तर भारतात हल्ले सुरू केले .उत्तर भारत हे शिंदेंचे राज्य होते, पण शिंदे जनतेला बेवारस टाकून पेशव्यांवर कब्जा मिळवण्यासाठी दौलतराव शिंदे पुण्यात होता,इकडे जनता बेवारस होती .शिंदे यांचा मुलुख यशवंतराव यांनी बेचिराखर केल्याची बातमी त्यांना पुण्यात कळाली. त्यानंतर शिंदेंनी पुणे सोडले व ते उत्तर भारतामध्ये पळाले. छत्रपती यशवंतरावांच्या नियोजनाचा इथे जबरदस्त फायदा झालेला दिसतो, पेशवे जागेवर राहिले . शिंदेंना पुण्यातून बाहेर काढले, नंतर शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या उज्जैन मध्ये  छावणी वर हल्ले केले ,मात्र मंदिर अथवा धार्मिक स्थळाना कोणतीही हानी होऊ दिली नाही. ३० ऑक्टोबर १८०१ मध्ये उज्जैन जवळ छत्रपती यशवंतराव व सर्जेराव घाटगे यांच्यामध्ये मोठी लढाई झाली आणि सर्जेराव घाडगे पराभूत होऊन मागे हटला.यामध्ये शिंदे यांचे सैनिक मारले गेले. यानंतर दौलतराव शिंदे हादरून निघाला. छत्रपती यशवंतरावां सोबत तहाची बोलणी करू लागला छत्रपती यशवंतरावांनी सरळ जबाब दिला पहिल्यांदा तुकोजीरावांसोबत जी बोलणी झाली आहेत ती मान्य असेल तर तह नाहीतर शक्य नाही. शिंदे यांची कोंडी करून छत्रपती यशवंतरावांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. पुण्याकडे जाताना यशवंतरावांनी आपले वकील पुढे पाठवून आपल्या मागण्या पेशव्यांपुढे मांडल्या.
पेशवा हा शिंदेंच्या दबावाखाली असल्याने काही करू शकत नव्हता, हे छत्रपती यशवंतरावांना कळले होते. त्यामुळे ते पुण्याकडे सैन्य घेऊन निघाले. रस्त्यात बारामती मध्ये युद्ध झाले. पेशव्यांना आणि शिंदेंना दोघांनाही यशवंतरावांच्या सैन्यांनी हरविले,  मग पुढे तसाच मोर्चा हडपसरला निघाला. बारामती मध्ये युद्ध हरल्यानंतर दुसरा बाजीराव हादरून निघाला तो आपल्या कुटुंबासह रायगडला स्थलांतरित झाला. नंतर यशवंतराव हडपसर घोरपडी वानवडी येथे युद्धासाठी तयार होते. यशवंतरावांनी पुन्हा पंधरा दिवस बाजीरावाला पत्राद्वारे मागण्याची विनंती केली पण बाजीरावाने काहीही प्रतिसाद दिला नाही.

२५ ऑक्टोबर १८०२ रोजी अभ्यंग स्नानाच्या दिवशी छत्रपती यशवंतराव पुण्यात कडाडले आणि हडपसर घोरपडी वानवडी या परिसरात शिंदे चे सैन्याना सळो की पळो करून सोडले यात मोठ्या प्रमाणात शिंदेंचे सैनिक मारले गेले .शिदे कडे विलायती पलटणी होत्या, यशवंतराव यांच्या कडे स्वदेशी सैन्य होते. स्वदेशी सैन्यांनी आपले प्राण पणाला लावून विजय खेचून आणला. ऐन दिवाळीत अक्षरशः पुण्यात रक्ता मासाचे सडे पडले. यशवंतरावांनी आधी सैन्याला सूचना दिली , आपले खरे शत्रू शिंदे आहेत, पेशवे नाहीत. पेशव्यांनी शिंदेंच्या दबावाखाली  राहून चुकीचे निर्णय घेतले होते त्यामुळे पेशव्या प्रति त्यांच्या मनात सहानुभूती होती.

 तसेच छत्रपती यशवंतरावांनी हडपसर घोरपडी च्या मैदानातील आपल्या तोफखान्यास आज्ञा केली होती "जरीपटका आमचा खावंद,  त्याज कडून 25 बार निघत तोवर, तुम्ही स्वस्थ असावे"....
तसेच घडले शत्रू सैनिकांकडून 25 बार पडेपर्यंत होळकर शांत राहिले. नंतर मात्र यशवंतरावांचे तांडव नृत्य सुरू झाले. शिंदे पेशव्यांच्या साठ हजार सैन्यांनी समोर येऊन हल्ला सुरू केला मात्र होळकरांच्या सैन्यांनी हडपसर येथे त्यांना रोखले. बंदूक तोफांच्या मारांनी शत्रू पक्षाचा पराभव अटळ होता शत्रूपक्ष माघारी पळू लागले थोडे पुढे जाऊन शिंदे यांच्या सैन्याची यशवंतरावांनी जागीच कत्तल केली आणि पळून जाणाऱ्या शिंदेंच्या सैन्यावर तोफा चालविल्या. शिंदेंचे दहा हजार सैन्य मारले गेले व होळकरांचे पेशवे सैन्यासह पर्वती वडगाव सिंहगड मार्गे महाड रस्त्याने वसई भागात इंग्रजांकडे पळून गेले. हडपसरच्या युद्धात धाडसी यशवंतरावांनी स्वतः शिंदेंच्या तोफा जवळ जाऊन अत्यंत चलाखी दाखवून त्या तोफांची तोंडे विरुद्ध दिशेने वळविली व त्यांचे सैन्य त्यांच्या तोफांनी मारले. त्यामुळे शिंदे यांच्या सैन्यांमध्ये हाहाकार निर्माण झाला. या युद्धामध्ये छत्रपती यशवंतराव यांचा विजय झाला.
 या युद्धानंतर पेशवे व शिंदे हादरले, भीतीने दुसरे बाजीराव पळून गेल. यानंतर छत्रपती यशवंतराव यांनी अमृतराव पेशव्यांना  पुण्यातल्या पेशव्यांच्या गादीवर बसविले.
छत्रपती यशवंतराव यांच्या भीतीपोटी ३१ डिसेंबर १८०२ रोजी बाजीराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा करार झाला.
बाजीरावा नंतर १८०३ ला शिंदे यांनी नागपूरच्या भोसलेंना इंग्रजां सोबत करार करायला लावला. होळकरांचा वाघ मात्र या दबावास बळी पडला नाही तो सिंहगर्जना करीत हिंदुस्थानच्या वस्तीत शिरकाव करणार्या इंग्रजांना भीती दाखवत त्यांचा फडशा पाडत,  सिंहगर्जना करत त्यांच्यावर आक्रमण करत होता. हा एकटाच वाघ इंग्रजांविरुद्ध उभा होता. झुंजणार्या शुर योध्दा यशवंतरावामुळे जागात हिंदुस्थानाची प्रतिमा नक्कीच उंचावली. आपल्या संस्कृतीत याचमुळे यशवंत व्हा असे तृप्त मनाने म्हटले जाते.

 १८०३ मध्ये इंग्रज संपूर्ण देशभर पसरले होते व 1808 मध्ये त्यांनी सत्ता गाजवायला सुरुवात केली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लाॅयल लेग यांनी होळकरांच्या विरुद्ध युद्ध पुकारा असे आदेश दिले होते. यशवंतरावांना सगळीकडून घेरले होते प्रसंग अवघड होता यशवंतरावांनी विद्युत वेगाने सैन्याला तयार केले आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढाई सुरू केली. जॉन मालकम हा इंग्रज अधिकारी  या लढाईचे नेतृत्व करत होता. हिंगळज घाटातून लढाईला सुरुवात केली ब्रिटिशांनी हिंगळज गड जिंकला, पण परत येताना यशवंतरावांनी घाटात सैन्यासह इंग्रजावर आक्रमण केले. मुकुंदरा घाटात ब्रिटिश सैन्य अधिकारी मारले, काही पळाले व काही जालीम सिंह राजाकडे वास्तव्यास मदत मागू लागले पण त्या राजाने यशवंतरावांना घाबरून मदत नाकारली. नंतर ब्रिटिश सैन्य जिकडे रस्ता दिसेल तिकडे बेफाम पळू लागले. 28 मे रोजी सुरू झालेले युद्ध आद्यप सुरूच होते. पावसाळ्यात नदी जवळ होळकर  सैन्यानी इंग्रजाचे सैन्य रात्रीत अडवून कापून काढले. काही सैन्य नदीकाठी नावाडी सोबत पळून गेले. नंतर पुढील नदीच्या काठावर भिल्ल लोकांनी पुन्हा सैन्य झोडपू काढले. भिल्ल लोक हे होळकरांचे मित्रच होते. नंतर शेवटपर्यंत ब्रिटिश सैन्याला होळकर सैन्यांनी ताणून ताणून मारले. ब्रिटिश अधिकारी आग्रा मध्ये किल्ल्यात जाऊन आतून दरवाजे लावून घाबरून बसले. इंग्रजांचा पराभव झाला होळकरांनी झोडपून काढलं, याचे पडसाद इंग्रजांच्या संसदेत उमटले.ब्रिटिशांची धोरण बदलली छत्रपती यशवंतराव नंतर दिल्लीला गेले.
 यामध्ये अनेक छोटी मोठी युद्ध करून १८०५ मध्ये यशवंतराव आपल्या राज्यात परत आले.
 नंतर इ.स. १८०५ ते १८०९ मध्ये छत्रपती यशवंतराव यांनी होळकर संस्थान इंदोर येथून आपला राज्यकारभार चालविला. पुन्हा पेशवे, शिंदे, इंग्रज या पैकी कोणाची ही होळकरांच्या राज्यांकडे डोकावून पाहण्याची हिंमत झाली नाही. 
 यशवंतरावांनी  सैन्याची ताकद वाढवण्यासाठी दारूगोळा साठा वाढवण्याचे काम  हाती घेतले.  कारण यशवंतरावांना इंग्रजां सोबत एकट्याने युद्ध करायचे होते त्यासाठी सर्व ताकतीने त्यांचे प्रयत्न सुरू होते.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं दुर्दैवाने 1809 ला ते एका तोफगोळ्याच्या कारखान्यात पाहणीसाठी गेले असता तिथल्या तोफेचा गोळ्याचा तुकडा त्यांच्या डोळ्यात उडून लागला व त्यामध्ये त्यांचा डोळा गेलाच. परंतु जखम ही खोलवर गेली , परिणामी  यशवंतराव यांचा आजार वाढला.  यशवंतराव आजारी असताना त्यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी राज्याचा कारभार पाहिला.१८११मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तुळसाबाई यांना मुलबाळ नव्हते. यशवंतरावांची दुसरी पत्नी केशरबाई यांचा मुलगा मल्हारराव तिसरा याला तुळसाबाईंनी दत्तक घेतले होते. यशवंतरावांचा काळ हा जनतेसाठी  स्वातंत्र्याचा काळ होता. छत्रपती यशवंतरावांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी पुन्हा डोके वरती काढले, पेशव्यांचा झेंडा उतरून इंग्रजांचा झेंडा लागला आणि आपण पारतंत्र्यात  गेलो.
                      
मयुरा मधुकर पाटील फार्मासिस्ट. 
९९२२१६५६४०

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*