इंदापूर तालुक्यातील सर्व १ लाख ५ हजार लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन यंत्रणेने अधिकाधिक नोंदणी करावी - आमदार दत्तात्रय भरणे.

इंदापूर  : महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून
शासनाने आणलेल्या मुक्यमंत्री लाडकी बहिण योजनेस अर्थमंत्री अजित पवार यांनी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  इंदापूर तालुक्यातील सर्व १ लाख ५ हजार लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन यंत्रणेने अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन आ.दत्तात्रय भरणे यांनी केले.
   इंदापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता नोंदणी करण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचे उद्घाटन आ. भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यावेळी उपस्थित होते.

    आमदार भरणे म्हणाले की, या योजनेतून इंदापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना दरमहा साडेपंधरा कोटी रुपये तर वर्षाला १८५ कोटी रुपये मिळणार आहेत. ही योजना यशस्वी व्हावी यासाठी अर्थसंकल्पातील तरतूद केलेली इतर कामे कट करण्याची निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यांनी जे गांभीर्य दाखवले ते इंदापूर तालुक्यातील शासकीय अधिका-यांनी दाखवावे. सद्यस्थितीत तालुक्याचा ग्रामीण भाग शहराच्या तुलनेत पुढे आहे. त्यामुळे शहरात ही संपूर्ण नोंदणी होईल याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.
    प्रदीप गारटकर म्हणाले की,महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ७५ वर्षात अनेक अर्थमंत्री होवून गेले. परंतू सर्वसामान्य लोकांसाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करुन देण्याची दानत केवळ आत्ताचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यामध्येच आहे. इंदापूर शहरात दहा हजार लाभार्थी आहेत. त्या सर्वांना लाभ मिळवून देण्यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न करावेत.
    या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गफूर सय्यद, सचिन सपकळ, साजन ढावरे, बचत गटातील लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

  व्यंकटेशनगर, वडार गल्ली, रोहिदासनगर, बागवान गल्ली, डॉ.आंबेडकरनगर, साठेनगर,सरस्वतीनगर,सावता माळीनगर अशा ठिकाणी लाभार्थी नोंदणीची शिबिरे घेण्यात आली.
 शहरातील ३१अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने नोंदणी कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
--------------------
चौकट: 
 नगरपरिषदेच्या वतीने एलईडी व्हॅनद्वारे या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता नगरपरिषदेच्या कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तेथे दररोज प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. शहरातील अंगणवाडीमध्ये असणाऱ्या सेविका व मदतनीस यांच्याकडे ही प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. : रमेश ढगे, मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद. 
_______________________________________



Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*